मुंबई | Shalini Thackeray On Kishori Pednekar – निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्ह आणि नावं देण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेनं तीन चिन्ह सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. तसंच ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव बहाल करण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शिंदे गटावर आणि भाजपवर निशाणा साधत आहेत.
विशेष म्हणजे या महाप्रबोधन यात्रेत अद्याप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पडेणेकर (Kishori Pednekar) दिसल्या नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच मुद्द्यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी किशोरी पेडणेकरांवर मिश्किल टिपण्णी केली. शालिनी ठाकरे यांनी एक ट्वीट करत किशोरी पेडणेकरांवर टीकास्र सोडलं आहे. शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी दिली जात असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत त्यांना बोलावलं नाही, म्हणून त्यांनी पक्षप्रमुखांकडे तक्रार केली. पण काहीही उपयोग झाला नाही. मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना नवीन शिल्लक सेनेकडून संधी दिली जाते. हे अजब आहे”, अशी खोचक टीका शालिनी ठाकरे यांनी केली आहे.