मुंबई : (Shambhuraj Desai On Abdul Sattar) ‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत’, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान अनावधानाने झालं आहे. त्यांची आणि माझी आज सकाळीच चर्चा झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विभागाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला असल्याचेही सांगितलं. मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण तरीही त्या होतात, असा त्यांच्या बोलण्याचा ओघ होता, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
छगन भुजबळ यांनी कांद्याच्या अनुदानावर बोलताना शिंदे सरकारने दिलेलं अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार असल्याचे म्हटलं होते. यावरही शंभूराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांना किती अनुदान मिळालं, याची माहिती घ्यावी. खरं तर त्यांच्या पेक्षा १०० रुपये आम्ही वाढवून दिले. जे त्यांना शक्य झालं नाही, ते आम्ही केलं.