शंभूराज देसाईंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; आम्ही तर फक्त…

मुंबई | Shambhuraj Desai On CM Uddhav thackeray- बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच आधिकार नव्हेत. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्री आधिकार वाटप देखील झाले नाही. राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदार संघात फंड मिळत नव्हता. याउल आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही कधीही कारवाई झाली नाही.” असं बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

पुढे शंभूराज देसाई म्हणाले, “नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने या निर्णयाची मी विधान परिषदेत घोषणा केली होती. यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थराज्य मंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरवठा करुन देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत.”

आम्हा राज्यमंत्र्यांची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा. म्हणूनच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला. आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे, असं देखील ते म्हणाले.

Sumitra nalawade: