“आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना…”, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल

मुंबई | Shambhuraj Desai – मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्यानं हा दौरा रद्द झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे तिने पाच महिन्यांपूर्वीच दाखवलेलं आहे. आमची हिंमत काय आहे?, आमच्यात काय धमक आहे? याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्याबाबत त्यांनी बोलू नये”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “जे भाजप व शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आहे हे सरकार महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि महाराष्ट्राकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. त्यामुळे कोणात धमक आहे आणि कोणामध्ये धमक नाही हे नुसतं बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझं एवढंच सांगणं आहे की जे तुमच्या काळात 2020 पासून सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या सवलती, त्यांना राज्याकडून केली जाणारी मदत थांबली होती, ती शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तात्काळ सुरू झालेली आहे. तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो.” असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात कबड्डीचा खेळ असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून यावं. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन या.”

“या लोकांमध्ये हिंमत नाहीये. ही लोकं हतबल, लाचार असून काही करू शकत नाहीत. फक्त बोलतात आणि आम्हाला शिव्या घालतात. त्या बोम्मईंना शिव्या घालून त्यांच्या नावानं बोंबला. शिवरायांचा इतिहास आणि बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात, घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला संरक्षण असून, जायला हवं. मात्र, मुळमुळीत धोरणं असलेलं हे सरकार आहे,” अशी टीका राऊतांनी केली होती.

Sumitra nalawade: