शिंदे गटाच्या ‘ट्रॅप’मध्ये ठाकरे अडकणार? राणांचे आरोप अन् देसाईंचे चौकशीचे संकेत!

नागपूर : (Shambhuraj Desai On Uddhav Thackeray) विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भूखंड घोटाळ्याचा आरोप करत विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना घेरण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनही प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्यात आल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी सभागृहात बोलताना उमेश कोल्हे हत्याकांडाकडे लक्ष वेधलं अन् उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. तत्कालीन एसपी आरती सिंग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. त्यांनी दरोड्याचे प्रकरण म्हणून तपास करत वेळकाढूपणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून दरोडा म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यात आल्याचा आरोप राणा यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली.

राणा यांच्याकडून मागणी होताच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ताबडतोब प्रतिसाद देण्यात आला. ‘अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची माहिती घेऊन, १५ दिवसांच्या आत राज्य गुप्तचर यंत्रणेकडून अहवाल मागवला जाईल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या टॅपमध्ये ठाकरे अडकतात का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: