मुंबई | Sharad Pawar – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न वरचेवर चिघळत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं घेतली आहे. त्यांचा विरोध पाहता महाराष्ट्रातील मंत्र्यांनी त्यांचा बेळगाव दौरा रद्द केला आहे. मात्र, कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नेते नारायण गौडा बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं असून, त्याला हिंसक वळण लागलं आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयी राज्य सरकारनं भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र, ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा आक्रमक इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
“अलीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी वक्तव्य केली आहेत त्यानं सीमावादाला वेगळं वळण लागत आहे. त्यांच्या सततच्या वक्तव्यांमुळे सीमा भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आज बेळगावात महाराष्ट्रातील काही ट्रकवर दगडफेक केली ही गोष्ट अतिशय निषेदार्ह आहे. या घटनेचा निषेध केला पाहिजे. सीमावाद प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात आहे. सीमा भागातील मराठी भाषेच्या लोकांना सतत त्रास दिला जात आहे. सध्या जो वाद सुरू आहे त्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य जबाबदार आहेत. हा वाद थांबवायचा असेल तर त्यासाठी आता दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी समन्वयातून मार्ग काढला पाहिजे. शिवाय केंद्रानं या प्रश्नावर बघ्याची भूमिका घेऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
View Comments (0)