Buldhana Accident – बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच नुकतीच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
यावेळी शरद पवार म्हणाले की, “समृद्धी महामार्गावर घडलेला हा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 लोकांचा बळी जाणं हे फार वेदनादायी आहे. कदाचित शास्त्रीय दृष्ट्या नियोजन न केल्यामुळे त्याचा दुष्परिणाम असा आहे. तसंच आमच्या गावात तर आता अशी चर्चा आहे की एखादा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोकं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. तर हा समृद्धी महामार्ग करण्याच्या काळात ज्यांच्यावर नियोजनाची जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात.”
“आज जी अपघाताची घटना घडली ती अत्यंत दु:खद आहे. तसंच आम्ही ऐकतोय की अपघात झाला राज्य सरकारनं पाच लाख रूपये दिले. पण पाच लाख रूपये मोजून हे प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या देशात रस्ते आणि त्यांचं नियोजन यांचं ज्ञान असणारे अनेक कर्तबगार लोक आहेत, अशा लोकांची एक टीम तयार करावी. तसंच कुठे चूक झाली आहे हे तपासलं पाहीजे. अपघात कसे थांबतील हे बघितलं पाहीजे. फक्त पाच लाख रूपये जाहीर करून हे प्रश्न सुटणार नाहीत”, असंही शरद पवार म्हणाले.