मुंबई | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज (7 नोव्हेंबर) मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयातून (Breach Candy Hospital) डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार सकाळी साडे दहा वाजता मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले. तसंच पवारांना आज डिस्चार्ज मिळणार असल्यासंदर्भात डाॅ. प्रतीत समदानी यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली होती.
शरद पवार यांच्यावर मागील आठ दिवसांपासून ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. तसंच तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र, प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्यानं त्यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी उपचार सुरू असताना देखील शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली होती. ते शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास डाॅक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकाॅप्टरने शिर्डीत दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचं दिसून आलं होतं. तर चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं होतं.