“देशासमोर अदाणींपेक्षा ‘हे’ तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत”, शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (7 एप्रिल) NDTV ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अदाणी (Adani) प्रकरणावर भाष्य केलं. संसदीय समिती अदाणी प्रकरणात नेमणं हे योग्य नाही. कारण संसदीय समितीत निम्म्यापेक्षा अधिक लोक सत्ताधारी पक्षाचे असतात. त्यामुळे सत्य कसं बाहेर येईल, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. तसंच आपल्या देशात अदाणींपेक्षा तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत, असंही पवार म्हणाले.

अदाणी यांच्यापेक्षा आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं मला वाटतं. उदाहरणार्थ वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या. देशासमोर हे तीन प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. जाणीवपूर्वक आदाणींना टार्गेट केलं आहे. त्यामुळे विरोधकांनी अदाणींपेक्षा देशासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, एक काळ असा होता की त्यावेळी आम्हाला सत्ताधारी पक्षावर टीका करायची असेल तर आम्ही टाटा बिर्लांचं नाव घ्यायचो. पण ही नावं आता घेतली जात नाहीत. याचं कारण आता देशालाही समजलं आहे की टाटा आणि बिर्लांचं देशासाठी काय योगदान आहे. तसंच देशासाठी अंबानी आणि अदाणी यांचंही योगदान आहे हे विसरता येणार नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं.

राज्यातील सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर अस्थिर होण्याची शक्यता आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले, निर्णय येऊ देत तसा आम्ही वाटच बघतोय. निर्णय तसा आला तर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ.

Sumitra nalawade: