मुंबई | Sharad Pawar – गेल्या काही दिवसांपासून राज्यात बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project) मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. हजारो स्थानिकांनी प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
शरद पवार म्हणाले, “जर तेथील स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे. अशावेळी लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. मी उदय सामंत यांच्याकडून रिफायनरीचा आढावा घेतला आहे. कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. यावर उद्या होणाऱ्या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहू. तसंच चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला मी दिला आहे.”
“मी उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला आहे. त्यांनी आम्ही आता कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे. सध्या फक्त जमिनीची तपासणी करत असून लोक त्याला विरोध करत आहेत. पण आता आम्ही लोकांना समजावून सांगितलं असून आता याला त्यांचा विरोध नाहीये, अशी माहिती सामंत यांनी दिली”, असंही शरद पवारांनी सांगितलं.