पुणे : (Sharad Pawar On Central Government) देशाची आणि राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती, तेव्हा तीन महिन्यांच्या आतमध्ये ७२ हजारो कोटींचे कर्ज माफ केलं होतं, असा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर आफलातून टोकेबाजी केली आहे.
दरम्यान, यावेळी शरद पवार पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना एका शेतकऱ्याने बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार म्हणाले, “जेजुरीच्या सहकऱ्यांनी सांगितलं, बाहेर फिरु नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला.
“मी केंद्रीय मंत्री असताना देशात फळबाग योजना आणली. त्याअंतर्गत फळबाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं. कोकणात गेलात तर, काजू आणि हापूसाचे हजारो एकर क्षेत्र आहे. एकेकाळी कोकणाचे लोक १६ वर्षे वय झालं की, मुंबईला कामासाठी जायचे. ६० वय झालं की गावाकडे माघारी यायचे. आज मुंबईला जायची भूमिका कोकणातील लोकांची नाही. फळबाग योजनेतून जास्तीत जास्त आंबा, काजू, फणस कसा लावता येईल, यासाठी प्रयत्न करतात,” असेही शरद पवारांनी नमूद केलं.