पुणे : (Sharad Pawar On Devendra Fadnavis) मागील काही दिवसांपासून फडणवीस-पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन राज्याच्या राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याला हात घातला होता. २०१९च्या सत्तासंघर्षात आमची थेट पवारांशी चर्चा सुरु होती, असं विधान त्यांनी केलेलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
दरम्यान, यावेळी त्यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसह राज्याच्या राजकीय घडामोडींवर पवारांनी भाष्य केलं. एका मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले होते की, २०१९मध्ये सत्तास्थापनेसाठी आमचीपवारांशी चर्चा सुरु होती. त्यावर काल पवारांनी एक विधान केलं होतं. जर पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? त्यांच्या या विधानाने राज्यात एकच चर्चा सुरु झाली. २०१९मध्ये पवारांच्या सांगण्यावरुनच अजित पवारांनी शपथ घेतली का? असे मुद्दे चर्चिले जावू लागले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली तेही पवारांनी स्पष्ट करावं.
त्याच मुद्द्यावरुन पवारांना आज प्रश्न विचारला असता त्यांनी, ते कालचं विधान चेष्टेत केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकले, असंही नंतर म्हटल्याचं पवारांनी सांगितलं. राष्ट्रपती राजवट जर माझ्या सांगण्यावरुन लागत असेल तर चांगली गोष्ट आहे. केंद्रामध्ये माझ्यामुळे सूत्र हालतात म्हटल्यावर माझी इज्जत खूपच आहे, अशी टिपण्णी पवारांनी यावेळी केली.