मुंबई : (Sharad Pawar On Devendra Fadnavis) राज्याच्या राजकारणात मागील तीन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, अजित पवारांचा शपथविधी घडविण्यामागे शरद पवारांची खेळी असू शकते. त्यामुळे यावर विविध तर्कांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पहाटेचा शपथविधी हा विषय गेले तीन दिवस गाजतो आहे. या शपथविधीचं नेमकं रहस्य काय? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, “अहो तीन वर्षे झाली या गोष्टीला. आता पुन्हा तो विषय कशाला काढता? त्यावर आता चर्चा करुन काय होणार आहे?” असा प्रतिप्रश्न त्यांनी या विषयावर पुन्हा पांघरुन टाकलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नवह्ता. त्या अनुषंगाने शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. २३ नोव्हेंबर २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली होती. या शपथविधीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवली होती.
हा शपथविधी होण्याच्या एक दिवस आधी रात्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत सरकार कसं आणायचं? याची खलबतं सुरू होती. त्या बैठकीत शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील असे दिग्गज उपस्थित होते. या बैठकीतून अजितदादा तडकाफडकी निघून गेले होते. त्यानंतर हा शपथविधी झाला. मात्र शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना पुढच्या २४ तासांमध्ये माघारी आणण्यात यश मिळवलं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.