मुंबई : (Sharad Pawar On Devendra Fadnavis) मागील वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात स्तर घसरताना दिसत आहे. त्याचा परिचय रविवारी पुन्हा एकदा आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 1977 मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदेंनी केलं तर गद्दारी? असं वक्तव्य केलं होतं. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे.
चंद्रपूरात एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले होते, “शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच टीकेला शरद पवारांनी खोचक उत्तर दिलं आहे.
दरम्यान यावेळी शरद पवार म्हणाले, “1977 मध्ये आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांनी त्या काळातील त्यांनी काही माहिती नसेल. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात,” असं ते म्हणाले.