मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टवर सर्वच क्षेत्रातील लोकांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. आता मात्र खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यावर म्हणाले की, त्या पोस्टबद्दल आपल्याला काही माहिती नाही, मी केतकी चितळेला ओळखत नाही, त्यामुळे नेमकं काय झालं आहे ते कळल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असे ते म्हणाले.
ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे. केतकी चितळे विरोधात कळवा पोलिस ठाण्यामध्ये कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुण्यातदेखील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी केतक चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.