नवी दिल्ली : (Sharad Pawar On Praful Patel) नव्या संसद भवनातील भेटीचा फोटो खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, एकत्रित फोटो ट्विटरवर टाकल्याबाबत पवारांनी पटेल यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यात प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली आहे. बंडानंतर काही दिवसांनी पवारांनी बंडखोरांना आपला फोटो वापरू नये; अन्यथा न्यायालयात खेचण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर अजितदादा गटाने पवारांचा फोटो वापरणे बंद केले आहे.
शरद पवारांची नव्या संसद भवानात भेट झाल्याचा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “नवीन संसद भवनातील आजचा दिवस ऊर्जेप्रमाणे उत्साहित राहिला. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्याने आणखीनच खास बनला. तसेच कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा, असा आजचा दिवस आहे”, असे प्रफुल्ल पटेलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.