आरक्षण… खूप झाले. आता अर्थकारण मजबूत करा, हे पवारांचे वक्तव्य खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रगल्भ मनोवृत्तीचे द्योतक मानले पाहिजे. विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून त्यांनी ही भूमिका मांडली. आता पवारसाहेब कसा पुढाकार घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शरद पवार म्हणजे कोलांटउड्या, हे समीकरण महाराष्ट्रात दृढ आहे. राजकीय सापेक्षतेने आपल्या भूमिका बदलायचा, हा त्यांचा मूळ स्वभावच आहे. सातत्याने सोयीने भूमिका घ्यायच्या, हे देखील त्यांचे गुणविशेष. आरक्षणासाठी आजवर अनेक लढाया लढलेल्या शरद पवारांनी काल मात्र आरक्षणाच्या विरोधात सूर आळवला आणि सर्वांना एकच आश्चर्य वाटले.
विशेष म्हणजे ज्या मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी देखील त्यामध्ये सहभागी झाले, त्या मराठा मोर्चाच्या सुरात सूर मिसळणाऱ्या किंवा त्यांचाच एक अंगभूत घटक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून त्यांनी आरक्षणापेक्षा अर्थकारणाला महत्त्व देण्याची भूमिका मांडली.
अर्थात जातीपातीचा विचारांच्या पलीकडे जाऊन समाजभान स्विकारणाऱ्या अनेकांनी शरद पवार यांचे हे वक्तव्य सकारात्मक घेतले व हा त्यांचा विधायक प्रवास असल्याचेही मान्य केले. त्यामुळे यंदाची पवारांची कोलांटउडी ही कदाचित विधायकतेच्या प्रगल्भ दिशेकडे जाऊ शकते, असे वाटते. आरक्षण…आरक्षण… बास झाले. आता अर्थकारण मजबूत करा, हे पवारांचे वक्तव्य खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रगल्भ मनोवृत्तीचे द्योतक मानले पाहिजे. ज्या संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून त्यांनी ही भूमिका मांडली, ती तेथे लोकांना फारशी रूचलेली दिसत नाही.
तथापि, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार साहेबांना जी उपरती झाली ती मात्र विचार करण्याजोगी आहे. सातत्याने मराठा समाजात नव्हे तर कुठल्याही समाजातील आरक्षणाच्या विषयांवरून रस्त्यावरचा संघर्ष शोधण्यापेक्षा स्वतःचे अर्थकारण मजबूत करण्याचा विचार हा केव्हाही महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या समाजाला आरक्षणाच्या चिंध्या चिवडण्याची गरज वाटली नाही किंवा त्याच्या मार्गाला ते गेले नाहीत, तेच आज अर्थकारणामध्ये कमालीचे यशस्वी असताना दिसत आहेत.
गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र या देशांमधील मारवाडी, गुजराती, ब्राह्मण समाजातील नेतृत्व किंवा व्यावसायिक असो किंवा उत्तर प्रदेशातील ठाकूर असो, त्यांनी कधीही आरक्षणाच्या संघर्षाच्या वळचणीला जाण्यापेक्षा बौद्धिक संपदेच्या बळावर जग जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. पवार साहेबांनी देखील विद्यापीठाच्या नामांतरापासून ते परवापरवाच्या मराठा आरक्षणापर्यंत आरक्षणाच्या लढ्यात आपला सूर मिसळला आहे. अर्थात त्या पाठीमागे त्यांचे वोट बँकेचे राजकारण असते आणि ती त्यांची अपरिहार्यता असते.
परंतु, प्रथमच त्यांनी थेट आरक्षणाच्या विचारापेक्षा आर्थिक सक्षमतेचा आणि अर्थकारण सुदृढ करण्याचा विचाराचा पुरस्कार करून मराठा समाजाच्या एका व्यासपीठावरून ठाम भूमिका निश्चितपणे प्रतिपादन केली. कदाचित बहुजन समाजातील तरुण आता या आरक्षणाच्या आणि जाती व्यवस्थेच्या भूलथापांना किंवा या कोंढाळ्यांना कंटाळून स्वतःच्या आत्मविश्वासावरील आर्थिक सक्षमतेच्या विचाराने प्रभावित झाला असावा आणि ही बदललेली दिशा, बदललेला समाजातील विचार पवारसाहेबांनी देखील ओळखला असावा, म्हणून त्यांनी आता मराठा समाजाच्या युवकांना देखील स्वतः आर्थिक सक्षम होण्यासंबंधीचे आणि उद्योजक होण्यासंबंधीचे आवाहन केले आहे.
आरक्षणाची लढाई ही त्यांची राजकीय मजबुरी असली तरी आपल्या समाजाने आर्थिक सक्षम व्हावे, ही तळमळ कुठल्या नेत्यांना नसेल? कदाचित पवारसाहेबांच्याही मनामध्ये असेल. परंतु, भावनेच्या राजकारणात कदाचित जातींना गोंजारण्याचे आणि त्यासाठी आरक्षणाच्या विचाराचा पुरस्कार करण्याचे सूर त्यांना जास्त जवळचे वाटत असावे.
कारण नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीला संघप्रणित भाजपपासून ते मुस्लीम समुदायापर्यंत सर्वांनी स्वीकारले आणि एकेक राज्य करत संपूर्ण भारत त्यांच्या नेतृत्वाखाली जोडला गेला, हे कुठल्या जातीला विकेंद्रीकरण मानून झाले नाही तर विकासाला आणि नेतृत्वाच्या विचारांवर श्रद्धा ठेवलेल्या समाजाने हे परिवर्तन केले आहे आणि त्यांचे नेतृत्व उभे राहिले आहे.
त्यामुळे कदाचित भारतीय समाज हा आता जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपला स्वतःचा सक्षमीकरणाकरता विचार करत आहे, हे देखील पवारांना समजले असावे. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या विचाराच्या सहकारी संस्थांमधून त्या आर्थिक सक्षमी करण्याकरता बहुजन समाजातील युवकांसाठी काय संधी उपलब्ध होतात आणि त्यासाठी पवारसाहेब नेमका कसा पुढाकार घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहेत.