“देशात एकाच बाजूने…”, गुजरात निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | Sharad Pawar – आज (8 डिसेंबर) गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपच्या (BJP) 25 वर्षाच्या सत्तेला आप पक्षाकडून सुरूंग लावणार असं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात निकाल हाती आल्यावर काँग्रेस आणि ‘आप’च्या पदरात काही पडलेलं पहायला मिळत नाही. तर भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता राखत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. याच निकालावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी केंद्राची पूर्ण ताकद लावण्यात आली आहे. गुजरातमध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागला म्हणजे देशात एकाच बाजूने मतप्रवाह होतोय असं नाही, असं शरद पवार म्हणाले.

“नुकत्याच काही निवडणुका पार पडल्या. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. त्या निवडणुकीसाठी देशातील सर्व शक्ती वापरली गेली. एका राज्याच्या सोईचे अनेक निर्णय घेतले गेले. त्या राज्यामध्येच अनेक प्रकल्प कसे जातील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम या निवडणूक निकालावर होणारच होता. गुजरातमध्ये तसाच निकाल लागला आहे. मात्र, गुजरातचा निकाल भाजपच्या बाजूने लागला म्हणजे देशामध्ये लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातोय हे खरं नव्हे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची महापालिका निवडणूक,” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, “दिल्ली महापालिकेची सूत्रं अगोदर भाजपकडे होती. आता येथे आम आदमी पार्टीची सत्ता आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अगोदर भाजपाची सत्ता होती. आत्ताच्या माहितीनुसार येथे भाजपाला 27 जागा मिळाल्या. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या आहेत. भाजपचे येथील राज्य गेले. दिल्लीमध्येही भाजपची सत्ता गेली. याचा अर्थ हळूहळू बदल होत आहेत. राजकारणामध्ये पोकळी असते. गुजरातची पोकळी ही भाजपने भरून काढली आहे. तर दिल्लीची पोकळी केजरीवाल यांनी भरून काढली. आज लोकांना बदल हवा आहे. मात्र याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

Sumitra nalawade: