भुजबळांनंतर टार्गेट मुंडे! १७ ऑगस्टपासून ‘साहेबांचा झंझावात’

पुणे | Sharad Pawar – नव्याने पक्षबांधणीसाठी निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा १७ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना साथ देणाऱ्या भाजपसाठी शरद पवार यांचे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार यांच्यासह ८ आमदार देवेंद्रवासी झाले. वयाची ऐंशी उलटलेले आपले काका दंड थोपटून मैदानात उतरतील अशी अपेक्षा अजित पवारांनी केली नसेल. पण काका लोकांत फिरू लागले. शरद पवार यांनी लोकांना हात जोडून नमस्कार केला तरी त्यांचा पक्ष पुन्हा उभा राहील, असे वर्णन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. हे वर्णन वास्तववादी असल्याने शरद पवार यांच्या दौऱ्याची दखल अजितदादा आणि त्यांचा साथीदार पक्ष भाजपला घ्यावी लागत आहे.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात अजित पवार आणि त्यांचे ८ सहकारी सहभागी झाले. राष्ट्रवादी पक्षात मोठी उलथापालथ झाली. मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस अगोदर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांना दूर केल्याचे पत्र अजित पवारांनी गुपचूप दिल्याचे उघडकीस आले. शरद पवार यांच्यासाठी हा धक्का होता. पण, या धक्क्याने खचून न जाता पवार यांनी पक्षबांधणीची नव्याने सुरुवात करत असल्याची घोषणा केली आणि पहिला दौरा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाचा केला. तेथील सभेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. आता १७ तारखेपासून पवार यांचा झंझावात सुरू होईल. धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यापासून दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होईल.

भाजपचे नेते कै.गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका, पुतण्यांमध्ये राजकीय तणाव झाला. भाजप सोडून धनंजय मुंडे बाहेर पडले आणि शरद पवार यांनी त्यांना आपल्या गोटात घेतले. धनंजय मुंडे यांना पक्ष नेता, कॅबिनेट मंत्री पद अशी पदे दिली. मात्र, मुंडे यांचा कल अजित पवार यांच्या बाजूनेच राहिला. फडणवीस यांच्या समवेत अजित पवारांचा सकाळचा शपथविधी झाला तेव्हा मुंडे अजित पवार यांच्या बरोबरच होते. आजही ते अजित पवार यांच्या बरोबरच आहेत. त्यामुळे बीडमधील शरद पवारांची सभा लक्षवेधी ठरेल. आपल्या माणसांना टार्गेट करून शरद पवार सभा घेणार असतील तर पाठोपाठ सभा घेऊन शरद पवारांना प्रत्युत्तर देवू, असा इशारा अजित पवार यांनी दिला. शरद पवार यांनी दौरे चालू करत असल्याची घोषणा तर केली आहे, आता अजित पवार त्यांच्या दौऱ्याची घोषणा कधी करणार ते पाहणे महत्त्वाचे आहे.

त्याच मतदारसंघात होणार सभा?

अजित पवार आणि त्यांचे ८ मंत्री यांच्या मतदारसंघात जावून तिथे सभा घेण्याचे शरद पवार यांनी ठरवले. मध्यंतरी सर्वत्र पाऊस असल्याने पवार यांचे दौरे थांबले होते. अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि समर्थकांनी पवार यांची भेट घेऊन पक्ष एकसंध ठेवू या, असे आवाहन केले. तरीही पवार शांतच राहिले. त्यांच्या शांततेचे वेगवेगळे अर्थ काढले जावू लागले. आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पुन्हा दौरे करणार असल्याची घोषणा पवार यांनी केली आहे.

Sumitra nalawade: