मुंबई | दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणी भाष्य करताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही’, असं म्हणत आदित्य ठाकरेंवर त्यांनी विश्वास दाखवला आहे.
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेश नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनात दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा उचलून सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती हे एसआयटीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
दरम्यान, ‘उद्योग कर उद्योग कार्यक्रमा’साठी शर्मिला ठाकरे आल्या होत्या. याच संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या काकू, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, चौकशा तर कुणीही लावेल. आम्हीही या प्रकारातून गेलो आहोत. पण आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.