नवी दिल्ली | Shatrughan Sinha On BJP – बिहारमधील सत्ताबदलानंतर टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार देशातून भाजपची राजवट संपवण्यासाठी एकत्र आले आहेत. विरोधी पक्ष आता पूर्वीपेक्षा मजबूत झाला असून आता सर्व विरोधक मिळून भाजपची राजवट संपवतील, असा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे.
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘नितीश कुमार यांनी भाजपला चोख उत्तर दिलंय. भाजपनं पैशाच्या बळावर महाराष्ट्रातील सरकार पाडलं, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता हिसकावून घेतली. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचूक उत्तर दिलंय.’
तसंच ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या व्यतिरिक्त विरोधी छावणीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे जनता ठरवेल, असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. मात्र, सर्व विरोधक आता देशातून मोदी राज संपवण्यासाठी एकत्र काम करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एका बाजूला एनडीए, तर दुसरीकडं संपूर्ण विरोधक एकत्र आहेत, असंही त्यांनी सांगितलं.