मुंबई : नाडिया बलात्कार प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. तसंच त्यांनी या प्रकरणावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं होतं. यावरुन त्यांना मोठ्या टीकेला सामोर जावं लागत आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईनंही ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली असून त्या मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं दिली आहे.
“एक महिला असतानाही जर त्या अशा प्रकारच्या टिपण्णी करत असतील तर त्या सध्या ज्या पदावर कार्यरत आहेत त्यासाठी त्या लायक नाहीत” असं निर्भयाच्या आईनं ममता बॅनर्जींच्या टिपण्णीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
दरम्यान, नाडिया बलात्कार प्रकरणावर टिपण्णी करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही गोष्ट ते अशा प्रकारे सांगितली जात आहे की एका अल्पवयीन मुलीचा बलात्कारामुळं मृत्यू झाला आहे. तुम्ही याला बलात्कार म्हणू शकता? ती प्रेग्नंट होती किंवा तिचं काही प्रेमप्रकरण होतं? त्यांची या प्रकरणाची चौकशी केली का? हे प्रश्न मी पोलिसांना विचारते. हे प्रेमप्रकरण होतं आणि हे स्पष्ट झालं असून तिच्या कुटुंबियांना देखील हे आधीच माहिती होतं. जर एखादं जोडपं नात्यात होतं तर आपण त्यांना थांबवू शकत नाही.