मुंबई | Sanjay Gaikwad On Sanjay Raut – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून फटाक्यांच्या आतषबाजीच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडण्याचा सूचक इशारा दिला. यानंतर काल (26 डिसेंबर) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यावर विधान भवन परिसरात आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश आहे, असं विधान केलं होतं. यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्याकडेही भरपूर बॉम्ब आहेत, असं म्हणत टोला लगावला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या विधानावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी आज (27 डिसेंबर) सकाळी माध्यमांशी बोलताना बॉम्बसंदर्भातल्या विधानावर भूमिका स्पष्ट केली. “गेल्या तीन दिवसांमध्ये जी दोन प्रकरणं काढली ते काय लवंगी फटाके आहेत का? देवेंद्र फडणवीस यांनी किमान राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. संपूर्ण सरकार अडचणीत आहे. एक-दोन मंत्री नाही. जे शिवसेनेतून फुटून बाहेर गेले आहेत त्या प्रत्येकाचा बॉम्ब किंवा लवंगी फटाका फुटत राहणार”, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांच्या या भूमिकेवर संजय गायकवाड यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “तो दगडी फटाकाही फोडू शकत नाही. त्या फटाक्यानं कुत्रंही पळू शकत नाही. आम्ही तर वाघ आहोत. आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही”, असं गायकवाड म्हणाले.
पुढे ‘हे सरकार फेब्रुवारीत पडेल’ या संजय राऊतांच्या विधानावर संजय गायकवाड म्हणाले की, “कधीकधी ते म्हणतात सरकार 15 दिवसांमध्ये पडणार. कधी म्हणतात महिन्याभरात पडणार. या संजय राऊतांना दिवसा स्वप्न पडतात आणि ती कधीच पूर्ण होत नाहीत, हे मी वारंवार सांगितलं आहे. पुढची 10-15 वर्षं हे सरकार कार्यकाळ पूर्ण करून कायम राहील”, असा दावाही गायकवाड यांनी केला आहे.