वरिष्ठांनी माझी कायमच नकारात्मक प्रतिमा तयार केल्याचा अजित पवारांचा आरोप
प्रतिनिधि : अमितकुमार टाकळकर
राजगुरूनगर | शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सिनेअभिनेते नाना पाटेकर, प्रदीप कंद, विलास लांडे यांच्या नावाचा विचार सुरू होता. मात्र शिवाजी आढळराव पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार त्यांना उमेदवारी देणार आहे. मात्र त्यांनी कोणत्याही तालुक्यातील हस्तक्षेप करायचा नाही. केवळ केंद्र सरकारच्या विषयांत लक्ष द्यायचे, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात केले. आमदार दिलीप मोहिते यांच्या खेडमधील सातकरस्थळ येथील निवासस्थानी हा मेळावा पार पडला. याप्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली हारगुडे, सुरेखा मोहिते, निर्मला पानसरे, कैलास सांडभोर, राजेंद्र मोहिते, कैलास लिंभोरे, अरुण चांभारे, जयसिंग दरेकर, मयूर मोहिते, राजाराम लोखंडे, अनिल राक्षे, सुभाष होले यांच्यासह सर्व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी एक तासभर दिलखुलास संवाद साधला. यावेळी अनेक गोष्टींचा ऊहापोह करून काही गौप्यस्फोट केले. पदाधिकाऱ्यांच्या पीडीसीसी बँक, पीएमआरडीए, जलसंपदा विभाग, कात्रज डेअरी आदी प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी ‘आगीतून निघून फुफाट्यात पडणार का?’ या प्रश्नाला नाही असे ठाम उत्तर देऊन खेडची जवाबदारी सर्वस्वीपणे मी घेत आहे, अशी ग्वाही दिली.
आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव यांनी २००४ निवडणुकीत शेलपिंपळगाव ग्रामस्थ व नातेवाईक यांच्यावर दाखल केलेली केस व मराठा क्रांती मोर्च्यात स्वतःसह ८४ समाजबांधवांवर झालेली केस मागे घेण्याची मागणी केली. चासकमान, कळमोडी व भामाआसखेड धरणांच्या पाणीवाटपाबाबत नाराजी व्यक्त केली. आढळराव यांनी २० वर्ष टोकाचा संघर्ष केला. त्यांची हीच भूमिका भविष्यात राहिली तर सर्वांचीच अडचण वाढेल, असे मोहिते यांनी सुनावले.
अजित पवार पुढे म्हणाले की, मी साठीच्या पुढे गेलो तरी पक्षात होणाऱ्या बदलात देखील मला विचारात घेतले जात नव्हते, मला विचारून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचे ठरवले. नंतर परत राजीनामा मागे घेण्यात आला. असे अनेकदा अनुभवले. वारंवार मला टार्गेट केले. याची कल्पना माझ्याबरोबर आलेल्या सगळ्यांना होती. म्हणुन निर्णय घेताना मला सर्वांनी साथ दिली असेही अजित पवार यांनी सांगितले.
आमचे ऐकले असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारी मंत्री व आमदार सुरतला जाऊ शकले नसते. अनेक राजकिय घडामोडी थांबल्या असत्या. असा खुलासाही शरद पवार यांच्या वर आरोप करीत अजित पवार यांनी केला. २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आपले सरकार होते. अडीच वर्षात दोन वर्षे कोरोना होता. कामे ठप्प होती. ठाकरे कार्यकर्त्यांना फारसे उपलब्ध होत नव्हते. त्यातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागात काही जण जास्तच हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे शिवसेना मंत्री आणि आमदारांत अस्वस्थता पसरली होती. आम्ही ‘मोठ्या साहेबांना’ सांगत होतो. ते एकनाथ शिंदे यांना फोन करायचे. शिंदे शेतात असल्याचे सांगायचे. अखेर जे व्हायचे ते झाले असेही अजित पवार यांनी सांगितले.
अखेर लोकांची कामे करायला सत्ता लागते. ती कुणाच्या तरी बरोबरीने घ्यावी लागते. केवळ आपल्या राज्यात एका पक्षाचे सरकार येत नाही. त्यामुळे भविष्यात सर्वानाच एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. आपण भाजप बरोबर गेलो तरी विचारधारा सोडलेली नाही. असे अजित पवार म्हणाले. हे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. शेजारी देश वचकून असल्याचा खुलासा केला. अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात आणखी वरचे स्थान मिळवायचे असेल तर मोदींना पर्याय नाही. विरोधकांकडे चेहरा नाही. विकासाचे व्हिजन नाही असे ते म्हणाले.
अजित पवार यांनी खेडची प्रशासकीय इमारत, कळमोडी धरणाचे पाणी पूर्व भागाला, बुडीत बंधारे यावर आचारसंहिता संपल्यावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. राजगुरुवाडा, होळकरवाडा, निमगाव खंडोबा सुधारणा होणार असल्यामुळे खेडमध्ये पर्यटन वाढणार आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा राजकारण हा पिंड नाही. ते राजीनामा देणार होते, मात्र मी त्यांना ही टर्म काशीबाशी पूर्ण करा असे विनवले. मला वेळ भेटत नाही, असं म्हणणारे कोल्हे कसे काय पुन्हा उमेदवारीला तयार झाले याचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आदेश टोपे यांनी सूत्रसंचालन केले तर अरुण चांभारे यांनी आभार मानले.
अजित पवार यांनी शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. आपले म्हणणं खरं असूनही म्हणावे तितके महत्व दिले गेले नाही, अशी खंत व्यक्त केली. शरद पवार यांची भूमिका कायमच दोलायमान राहिली आहे. भाजप बरोबर सरकार स्थापन करणेसंदर्भात अनेकदा प्रयत्न झालेत. पहाटेच्या शपथविधीने माझी नकारात्मक प्रतिमा तयार झाली. मात्र यांनीच मला तोंडघशी पाडले. मोदींना झुलवत ठेवल्याने भाजपाने यांच्याशी फारकत घेतली व त्याचा परिणार पक्षफुटीवर झाला असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी खेडच्या मेळाव्यात केला.