मुंबई : (Eknath Shinde On Shivsena Leader) सोमवार दि. २० रोजी रात्रीपासून शिवनेता नेते एकनाथ शिंदे हे नाॅट रिचेबल असून, त्यांच्यासोबत ३०-३५ आमदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक हे एकनाथ शिंदे थांबलेल्या सूरतमधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. बऱ्याच वेळापासून सेना नेते शिंदें यांच्यासोबत चर्चा चालू आहे.
दरम्यान, शिंदे आणि नार्वेकर यांच्यात कोणता तह होणार की, बैठक विस्कटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बैठक संपली असली तरी निर्णय मात्र गुलदस्त्यात आहे. शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तिन प्रस्ताव सेनेसमोर ठेवले आहेत मविआ’तून बाहेर पडा, गटनेते शिंदेच राहतील, तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तास्थापन करुन शिंदे यांना उपमुख्यमंत्री देण्यात यावा हा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवले आहेत.
नार्वेकर हे शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले असतानाच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासे केले आहेत. मला एकनाथ शिंदेंचा नाईलाज माहित आहे. मी त्यांच्याशी बोलायचो. आमच्यावरही ईडीने दबाव आणला. पण म्हणून आम्ही पक्ष सोडला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तसंच शिवसेनेच्या आमदारांंचं अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातच नितीन देशमुखांना हृदयविकाराचा झटका आला, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
सेनाभवनाबाहेर बंदोबस्त वाढण्यात आला आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक सेना भवनाबाहेर जमायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.