पुणे : बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू कायम ठेवून रंगमंदिराचे विस्तारीकरण करावे. मात्र बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे मॉल, बहुद्देशीय हॉल आणि छोटी-मोठी तीन नाट्यगृहे बांधण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र बालगंधर्व रंगमंदिर पाडून तेथे नाट्यसंकुल उभारण्याबाबत विविध मतप्रवाह पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याबाबतचे निवेदन शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेता पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख श्याम देशपांडे आणि प्रशांत बधे यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना दिले.
बालगंधर्व रंगमंदिर पाडून येथे नव्याने मॉल, बहुद्देशीय सभागृह, कलादालन, विविध आसन क्षमतेची तीन नाट्यगृहे बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिर नाट्यकलावंत आणि पुणेकरांसाठी अस्मितेचे प्रतीक आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना रंगमंदिराची मूळ जुनी वास्तू कायम ठेवून नवीन नाट्यगृह उभारता येऊ शकते. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मांडण्यात आला, तेंव्हा त्याला पुणेकर, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नाट्यकर्मींनी विरोध केला होता.
त्यामुळे हा विषय मागे पडला होता. मात्र पुन्हा हा प्रस्ताव दामटून महापालिका प्रशासन नक्की कोणाचे हित साधत आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे, अशी भूमिका शिवसेना पदाधिकार्यांनी मांडली.