मुंबई | Shiv Thakare – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) या पर्वातील स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चांगलाच चर्चेत आहे. शिव मनोरंजनसृष्टीत चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे. त्याचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. मात्र, शिवनं त्याच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात भरपूर स्ट्रगल केलं आहे. यावेळी त्याला कास्टिंग काऊचचाही (Casting Couch) सामना करावा लागला आहे. याबाबतचा धक्कादायक किस्सा त्यानं सांगितला आहे.
शिवनं एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला की, “मी एकदा आराम नगर येथे ऑडिशनसाठी गेलो होतो. त्यावेळी एक व्यक्ती तिथे आला आणि तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला. त्यानंर इथे एक मसाज सेंटर आहे, असं तो मला म्हणाला. मग मला मसाज सेंटर आणि ऑडिशन देण्याचं कनेक्शन समजलं नाही. पुढे त्या व्यक्तीनं मला विचारलं, तू वर्कआऊट करतोस का? इथे ऑडिशननंतर एकदा ये. त्या व्यक्तीचं हे बोलणं ऐकून मी तिथून निघून गेलो. तो एक कास्टिंग डिरेक्टर होता. म्हणून मी त्याच्यासोबत पंगा घेतला नाही. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की कास्टिंग काऊच फक्त मुलींसोबतच होत नाही तर मुलांसोबत देखील होतं.”
शिवला एकदा सोडून दोनदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. त्यानं दुसऱ्यांदा झालेल्या कास्टिंग काऊचबद्दलही सांगितलं आहे. तो म्हणाला, “एक मॅडम होत्या त्या चार बंगला येथे आल्या होत्या. त्या मला सांगत होत्या की ‘मैने इसको बनाया, मैने उसको बनाया है.’ तसंच त्यांनी मला रात्री 11 वाजता ऑडिशनसाठी बोलावलं होतं. त्यावेळी मला प्रश्न पडला की रात्री कोणत्या ऑडिशन घेतल्या जातात. मग त्यांना मी सांगितलं की, मला दुसरं काम आहे त्यामुळे मी भेटू शकत नाही. त्यावर त्या म्हणाल्या, तुला काम नकोय का? तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही”, असा धक्कादायक अनुभव शिवनं सांगितला आहे.