नवी दिल्ली | गेल्या सात दिवसांपासून जंतरमंतरवर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात देशातील कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर मोदी सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय कुस्ती संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या खेळाडूंच्या या आंदोलनाबाबत बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.
बृजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले?
बृजभूषण सिंह यांनी एका कवितेद्वारे या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मित्रांनो, ज्या दिवशी मी माझ्या आयुष्याचा आढावा घेईन, त्यादिवशी मी काय गमावलं अन् काय कमावलं. हे कळेल. जर मला वाटलं की माझी लढण्याची क्षमता संपली आहे आणि मी असहाय्य झालो आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल. असं जीवन जगण्यापेक्षा मृत्यू जवळ करणं मला आवडेल, असं ते म्हणाले.
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले आहेत. याप्रकरणी २८ एप्रिलरोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.