शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक सल्ला; म्हणाले, “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”

सातारा : (Shivendraraje Bhosale On Udayanraje Bhosale) “राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीत होत असते. त्यामुळं महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीत जावं आणि राज्यपालांविषयी निर्णय घेण्यास केंद्र सरकारला भाग पडावं”, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिला आहे. त्यामुळे सातारच्या दोन राजेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सातारा पालिकेत जाऊन घरपट्टी पालिकेकडून नियमबाह्यारीत्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू असून ही अन्यायकारक कर आकारणी त्वरीत थांबवावी यासाठी प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांबाबत सर्वांनीच जपून बोलले पाहिजे. अपमान, अवमान होईल अशी वक्तव्य करू नयेत. इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सगळ्याच पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बोलण्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे भाजप मधील ज्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत, त्यांना योग्य समज देतील”, असं शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

Prakash Harale: