शिवनेरीवर अवतरणार ‘शिवकालीन राज्य’; शिवजयंतीनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांची जय्यत तयारी

पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393वा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यानुसार यंदा 17 ते 21 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.

किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याचप्रमाणे प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Dnyaneshwar: