मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसंच महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणायची आहे असंही म्हटलं. लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांना एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे. डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. ते अनेक वादळांमध्ये शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या भेटीतून शिंदे यांना नक्कीच बोध मिळेल. ते एकनिष्ठता वगैरे सारख्या गोष्टी त्यांच्याकडून शिकतील, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत शिंदे गटाकडून होणाऱ्या नियुक्त्यांसंदर्भात बोलताना म्हणाले, शिवसेना इथंच आहे. ते कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. त्यांना अधिकार काय आहे. हा पोरखेळ चालला आहे. त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. आपला संबंध काय आहे पक्षाशी. ज्या वृक्षाच्या सावलीत मोठे झाले, फळं खाल्ली त्याच पक्षातून आपण बाजूला झालेला आहात. आपण दुसरा पक्ष स्थापन करावा आणि आपलं आस्तित्व दाखवावं, असं ते म्हणाले. तसंच राज्यात सत्तांतर होईल या मताशी मी ठाम आहे, असं देखील राऊत म्हणाले.
प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही, लोकांकडून लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असंही राऊत म्हणाले.