मुंबई : Shivsena Appoints Kedar Dighe – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना खिळखिळी झाली. या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील हुकमी एक्के बाहेर काढून नवी चाल खेळली आहे.
दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. केदार दिघे यांच्या नियुक्तीनंतर ठाण्यात पुन्हा शिवसेनेचे ‘दिघे राज’ सुरू होणार का?, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर, आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे. काही नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांवर ठाकरेंनी पुन्हा विश्वास दाखवला आहे.