मुंबई | Shivsena Dasara Melava 2022 – यंदाचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. तसंच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं परवानगी न दिल्यास शिवसेनेनं पर्यायांचा शोध सुरू केला आहे.
शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेच्या मार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिलं आहे. बीकेसीमध्ये दसरा मेळावा आयोजित करता यावा याकरता परवानगीसाठी पत्र लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, काल (13 सप्टेंबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिंदे गटाची या मेळाव्यासंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली. यांत जे काही होईल ते नियमानुसार होईल म्हणत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला आहे.