मुंबई | Shivsena Dasara Melava 2022 Verdict – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) दसरा मेळावा घेण्यासाठी वाद सुरू होता. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यास परवानगी दिली आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कुणाला या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध मुंबई महापालिका असा सामना हायकोर्टात रंगला. कोर्टानं आजच्या अन्य सुनावणी बाजूला ठेवत, दसरा मेळाव्याबाबत सविस्तर सुनावणी घेतली. त्यानंतर तिन्ही बाजूचे दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या पारड्यात टाकला. सर्वात आधी हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हायकोर्टाने महापालिकेलाही झापलं. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होतंय, असं हायकोर्ट म्हणालं.
दरम्यान, निकाल देताना हायकोर्टानं स्पष्ट केलं की, “आमचा निकाल देण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करतो, खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो विषय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या निकालाचा त्यांच्या सुनावणीवर किंवा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. राज्य सरकारनं शिवाजी पार्कचा वापर 45 दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवला आहे. पालिकेच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी आपला अहवाल दिलेला आहे. दादर पोलीस स्टेशननं पोलीस संख्याबळ पाहता आपल्या अहवालात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर दोन्ही अर्ज फेटाळून लावण्याचं मत दिलेलं आहे. अर्ज फेटाळून पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होतंय”.