मुंबई : (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray’s ‘Mashal’ symbol) शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि भाजप-शिंदे गटातील संघर्षामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. 14 रोजी ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मागील साडेतीन-चार महिन्यापासून धक्क्यावर धक्के मिळत असलेल्या अडचणी शिवसेनेची पाठ सोडताना दिसत नाहीत. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून नव्याने दिलेल्या ‘धगधगती मशाला’ या चिन्हावरही समता पक्षाने दावा केला होता. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका समता पक्षाकडून दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती समता पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल दिली आहे. ते म्हणाले की, “निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेल्या मशाल चिन्हावर आमचा आक्षेप आहे. त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. मशाल हे चिन्ह समता पक्षाची ओळख आहे. ते चिन्ह आमच्या पक्षासाठी आरक्षित असताना निवडणूक आयोगाने शिवसेनेला कसे काय दिले,” असा सवालही उदय मंडल यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण गेला, आता मशालही जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.