जनतेला शिवतारे यांनी वार्‍यावर सोडले : सचिन अहिर

सासवड : पुरंदर तालुका माझा म्हणणारे लोक एका दिवसात एवढे बदलतात, की संपूर्ण पुरंदर हवेली तालुक्यातील जनतेला अक्षरशः वार्‍यावर सोडून हे गेले किती जनतेवर प्रेम, निष्ठा, आपुलकी राहिली आहे, हे दिसून येत आहे. खरेतर शिवतारे हे कट्टर शिवसैनिक नव्हतेच, त्यामुळे जे गेले ते गेले आणि राहिले ते कट्टर शिवसैनिक खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक जागेवर आहेत, असे प्रतिपादन सचिन अहिर यांनी सासवड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी नीलम गोर्‍हे म्हणाल्या, की शिवतारे यांना काय कमी केले होते. पक्षात प्रवेश केल्यावर लगेच आमदारकी दिली. निवडून आल्यावर लगेच मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या विवाह सोहळ्याला स्वतः उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. उपोषण, सरपंच, सत्कार यालादेखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. शिवतारे यांनी संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, अशा घातकी माणसाला जनता माफ करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. याप्रसंगी रवींद्र मिर्लेकर, अभिजित जगताप, धाडसी मोडक, शंकर हरपळे यांच्यासह अनेक निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून आता शिवसैनिक कामाला लागले आहेत. खरे निष्ठावंत शिवसैनिक जागेवर आहेत, या शिवसेनेच्या जिवावर शिवसेना उभी राहिली आहे, तेच खरे मावळे बाकी उडाले ते कावळे, असे प्रतिपादन सचिन अहिर यांनी केले.

आता शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवून देऊ. कारण निष्ठावंत शिवसैनिक मूठभर असले तरी ते कट्टर शिवसैनिक आहेत आणि आगामी निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते खासदारकीपर्यंत सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार आहे. अनेक शिवसैनिकांच्या मनातील उद्रेक या ठिकाणी दिसून येत होता. पत्रकार परिषदेनंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसैनिकांना आपल्या वैयक्तिक पातळीवर काम कसं करावं लागेल, यासंदर्भात बैठक आयोजिली होती.

Dnyaneshwar: