पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सध्या २ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. सर्व रक्तगटाच्या पिशव्यांचा तुटवडा असल्याची माहिती रक्तपेढ्यांमधून देण्यात आली.
नातेवाईकांची धावाधाव
शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना ठराविक रक्तगटाच्या पिशव्यांसाठी धावाधाव करावी लागत आहे. महिलांची प्रसूती शस्त्रक्रिया, गंभीर अपघातातील रुग्ण तसेच विविध शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज लागते. त्याचप्रमाणे, गंभीर थॅलेसेमिया आजार असलेल्या रुग्णांना दर पंधरा दिवसाने किंवा महिन्याने रक्त द्यावे लागते. या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांची सध्या रक्त मिळविण्यासाठी विविध रक्तपेढ्यांमध्ये धावपळ सुरू आहे.
वायसीएम रक्तपेढीमध्ये सध्या 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांमार्फत काही रक्तदान शिबिरे व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचप्रमाणे, जे नियमित रक्तदाते आहेत, त्यांनाही रक्तदानासाठी बोलावत आहोत. सध्या जाणवणारी रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान शिबिरासाठी विविध संस्था, संघटना, कंपन्या यांनी पुढे यावे, असे आवाहन वायसीएम रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी नीता घाडगे यांनी केले आहे.
सध्या सर्वच रक्तगटाचे रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत. रक्तदान शिबिर घेतल्यानंतर त्यामध्येदेखील कमी रक्ताच्या पिशव्या जमा होत आहेत. आयोजकांमार्फत भेटवस्तू देऊन रक्तदान करण्याची पद्धत बंद व्हायला हवी. आमचे रक्तदान शिबिरांसाठी नियोजन सुरु आहे, अशी माहिती पिंपरी सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकचे दीपक पाटील यांनी दिली