पुणे | Pune News – श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट (Shree Jangli Maharaj Devasthan Trust) आणि श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ (Shri Sadguru Jangli Maharaj Bhajani Mandal) आयोजित जंगली महाराज यांच्या 133व्या पुण्यतिथी उत्सवाला 22 मार्च पासून सुरुवात झाली आहे. पुण्यतिथी उत्सव हा 22 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत होणार आहे. श्री सद्गुरू जंगली महाराजांच्या समाधीला चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी सात वाजता अभ्यंगस्नान घालून पूजा करण्यात आली. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सनईच्या मंगलमय सुरावटीने देवस्थानचा परिसर भक्तिमय झाला होता व श्री सद्गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांच्या भजनाने पुण्यतिथी उत्सवास सुरुवात झाली. या वेळी समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.
5 एप्रिल (चैत्र शुद्ध चतुर्दशी) रोजी महाराजांची मिरवणूक श्री सद्गुरू जंगलीमहाराज भजनी मंडळासह मूळ गादी स्थान असलेल्या ग्रामदैवत रोकडोबा मंदिर येथून ग्रामप्रदक्षिणा होऊन श्री सद्गुरु जंगली महाराज मंदिरात येईल व महाराजांच्या समाधीची पूजा होऊन परत मुळ गादी स्थान येथे मार्गस्थ होईल.
सदर पंधरा दिवसांच्या उत्सवामध्ये धार्मिक कार्यक्रम, महिला भजने, व्याख्याने आणि संगीत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सदर उत्सवाची सर्व रूपरेषा श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या पट्टशिष्या रखुमाबाई गाडगीळ उर्फ आईसाहेब यांनी ठरवून दिलेली असून उत्सवाला 133 वर्षाची परंपरा लाभली आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, भजनी मंडळाचे अध्यक्ष तेजस तापकीर आणि प्रमुख विणेकरी महेश दुर्गे यांनी दिली.