मुंबई | Shreya Bugde – गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानं आणि विनोदीशैलीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर अभिनेता कुशल बद्रिकेबद्दलची (Kushal Badrike) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत मराठी अवाॅर्ड्स 2022 ची नाॅमिनेशन पार्टी पार पडली. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेत्री श्रेया बुगडेनंही वेस्टर्न ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. तसंच तिचे या लूकमधील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर या लूकमधील फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “कुशल बद्रिकेने माझ्या फोनमधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा 1 व्हिडीओ बनवला आहे आणि मला तो पोस्ट करण्याची जबरदस्ती केली आहे, म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. पण तुम्हाला लाइक्स आणि कमेंट्स करण्याची जबरदस्ती तो करू शकत नाही. म्हणुन मी देवाचे आभार मानते.” श्रेया बुगडेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टवर कुशल बद्रिकेनंही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. “वा.. वा…. काय जबरदस्त व्हिडीओ केलाय मी, शाब्बास रे माझा मला”, असं त्यानं म्हटलं आहे.