मुंबई | Shreyas Talpade – सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती ‘पुष्पा’ चित्रपटाची. 2021 मध्ये पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांना अगदी वेड लावलं होतं. तसंच आता ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसंच या चित्रपटाचा मुख्य अभिनेता, सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आज (8 एप्रिल) वाढदिवस आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनवर चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेनंही (Shreyas Talpade) अल्लूला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रेयस तळपदेनं हिंदी व्हर्जनसाठी ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुननं साकारलेल्या पुष्पा या भूमिकेला आवाज दिला होता. तसंच आताही पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये श्रेयसचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अशातच श्रेयसनं अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त (Allu Arjun Birthday) खास पोस्ट शेअर केली आहे.
श्रेयसनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पुष्पा 2′ चा हिंदी टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्यानं लिहिलं आहे की, “अब रूल पुष्पा का..और पुष्पा कभी झुकेगा नही साला..अल्लू अर्जुनजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा. तुझा हा खास दिवस आणि येणारी सगळी वर्ष जबरदस्त जावोत अगदी या पुष्पा 2 च्या टीझरसारखी. मजेशीर गोष्ट म्हणजे, एक दिवस मी ती शेवटची ओळ डब करण्यासाठी गेलो आणि पुन्हा त्या सर्व आठवणी मनात जाग्या झाल्या. काय भारी अनुभव होता तो!” श्रेयसच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.