दगडूशेठ मंदिरातर्फे साकारणार श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती

पुणे-Dagadusheth Halwai Ganapati Trust | तब्बल दोन वर्षांनंतर यंदा कोरोना संकट आटोक्यात आल्याने गणेशोत्सव पुन्हा पहिल्यासारखा धामधुमीत साजरा करण्याला सुरुवात झाली आहे.

पुण्यातही लोकप्रिय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. आज यंदाच्या गणेशोत्सवासाठी सजावटीचा शुभारंभ झाला आहे. यावर्षी दगडूशेठच्या गणेशोत्सवामध्ये हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारली जाणार आहे. यंदा कोरोना संकटाची भीती कमी झाल्याने मागील २ वर्ष मुख्य मंदिरात विराजमान होणारी बाप्पांची मूर्ती पुन्हा उत्सव मंडपामध्ये विराजमान होणार आहे. त्यासाठी तयारीदेखील सुरू झाली आहे.

पुण्यात सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा पार पडला आहे. हिमालयाच्या सान्निध्यात असलेली भगवान शिव शंकराच्या पंचकेदार मंदिराची प्रतिकृती यंदाच्या दगडूशेठच्या गणेश उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. पुण्यात श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती १०० फूट लांब, ५० फूट रुंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड वापरून त्यानंतर रंगकाम केले जाईल. अंतिम टप्प्यात यावर विद्युत रोषणाई होईल.

राजस्थानमधून आलेले कारागीर त्यामध्ये सहभाग घेणार आहेत. प्रत्यक्ष शिवशंकराचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा समूह म्हणजे पंचकेदार मंदिर आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंडमधील गढ़वाल येथे स्थित असून, शंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. श्रीपंचकेदार मंदिर म्हणजे तीर्थस्थळातील प्रमुख असलेल्या चारधाम यात्रेचे एक प्रमुख मंदिर आहे.

Dnyaneshwar: