मुंबई | Siddharth Shirole On Thackeray Government – गेल्या दोन दिवसांपासून टाटा एअरबस प्रकल्प (Tata Air Bus Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. तसंच हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. यादरम्यान, टाटा-एअर बस प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यावरून भाजपवर टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं राज्याच्या जनतेशी केलेलं पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी केली आहे. ठाकरे सरकारनं महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचं वाटोळं करून आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही शिरोळेंनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशांतर्गत विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी 8 सप्टेंबर 2021 रोजी एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रीमंडळ सुरक्षा समितीनं मान्यता दिली. तसंच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयानं हिरवा कंदील दाखविल्याचं रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीरही केलं होतं, असं सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं.
मात्र, असं असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं पाठवलं नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. या वस्तुस्थितीची माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचं राजकारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये. मुद्यांवर बोलायचं असल्यास टाटा एअरबसला लिहिलेलं एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावं, असं आव्हानही शिरोळे यांनी केलं आहे.