लातूर | ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून मल्ल सहभागी होतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मल्लांनी सहभाग नोंदवला. रात्री उशिरापर्यंत कुस्ती स्पर्धा सुरू होती. अंतिम लढतीत पुणे येथील सुहास घोडके याने प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सिद्धेश्वर केसरीच्या किताबावर नाव कोरले आणि देवस्थानच्या वतीने दिली जाणारी चांदीची गदा पटकावली.
या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या सिद्धेश्वर केसरीचा बहुमान पुण्याचा पैलवान सुहास घोडके याने पटकावला. देवस्थानच्या वतीने चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दिले जाणारे 51 तोळे चांदीचे कडे देवंग्रा येथील पैलवान गणेश काळे याला मिळाले.
स्व. सुधाकरराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ अमर कोकाटे यांच्या वतीने दिले जाणारे चांदीचे कडे शिवली येथील पैलवान दीपक सगरे याला मिळाले.
स्व. ज्ञानोबा गोपे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे 21 तोळे चांदीचे कडे साई येथील पैलवान पंकज पवार याने मिळवले.
कुस्ती स्पर्धा पार पडल्यानंतर देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे, अशोक भोसले, पोलीस निरीक्षक प्रेमसागर माकोडे यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.