चंदीगड | Sidhu Moose Wala’s Parents Made A Demand To The Home Minister – पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे राजी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. तसंच मुसेवाला यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंजाबमधील आप सरकराविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सिद्धूच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांनी चंदीगडमध्ये केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू मुसेवालाच्या पालक गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचताच ढसाढसा रडू लागले. यावेळी त्या दोघांनीही आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून केली जावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गृहमंत्री अमित शाह आणि यांचे आई वडील पहायला मिळत आहेत. यादरम्यान सिद्धू मुसेवाला यांचे वडील हात जोडून अमित शाहांकडे मुलाला न्याय देण्याची मागणी करत आहेत. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही दिसत आहे.
दरम्यान, पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता. मुसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना AK 47 या बंदुकीने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ३२ राऊंड फायर करण्यात आले. त्यात त्यांच्या शरीरात १६ गोळ्या लागल्या. या घटनेमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली होती.