पिंपरी : पिंपळे निलख विशालनगर या परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन येथे स्वतंत्र दोन पाण्याच्या नवीन टाक्या उभाराव्यात, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र दिनापासून येथील दहा हजार नागरिकांचे सह्यांचे निवेदन घेण्याचा उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दहा हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन १० मे पर्यंत घेऊन स्वाक्षरीपत्र बुधवारी (दि.११) आयुक्त राजेश पाटील यांना भेटून देण्यात येणार आहे. पिंपळे निलख विशालनगर परिसरात मागील तीन वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई भासत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे.
नागरिक वेळोवेळी महानगरपालिकेचा मिळकतकर आणि पाणीपट्टी भरत असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे सचिन साठे म्हणाले. पिंपळे निलख गावठाण, पंचशीलनगर, गणेशनगर, रक्षक सोसायटी, विशालनगर, आदर्शनगर, जगताप डेअरी येथील परिसरासह विविध सोसायट्यांमध्ये अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पैसे देऊन टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. यावर महापालिकेने स्वखर्चाने पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांनी टँकरचे दिलेले बिल प्रशासनाने अदा करावे, अशी मागणी साठे यांनी केली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी देखील या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी साठे यांनी शिष्टमंडळासह प्रशासक राजेश पाटील यांना भेटून निवेदन दिले होते.
तरीदेखील यावर प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही. आता विस्कळीत पाणीपुरवठ्याविषयी तीव्र आंदोलन करू, असा इशारा साठे यांनी दिला आहे. सह्यांच्या मोहिमेप्रसंगी माजी पोलिस पाटील भुलेश्वर नांदगुडे, विजय जगताप, नितीन इंगवले, कैलास चव्हाण, प्रकाश बालवडकर, ज्ञानोबा बालवडकर, साहेबराव नांदगुडे, दिलीप बालवडकर, संजय दळवी, अनंत कुंभार, सुरेश बापू साठे, अनिल संचेती, नाना सदाकाळ, जगदाळे मामा, नाना गुंजाळ, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.