नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम बदलण्याचे संकेत दिले आहेत. परीक्षेवरील चर्चेदरम्यान बदल करण्याच्या दृष्टीने शिक्षण सचिवांंमार्फत सर्व मंत्रालयांना पत्र लिहून सूचना मागवल्या आहेत. जेणेकरून त्या सूचनांच्या आधारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल करणे शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही बेंगळुरूमध्ये (एनसीईआरटी) अभ्यासक्रमात बदल करणाऱ्या नॅशनल स्ट्रिंगिंग कमिटीच्या सदस्यांची भेट घेतली होती.
लहान मुलांना सुरुवातीपासूनच चांगल्या सवयी लावल्या, तर देशात स्वच्छतेची जनजागृती प्रत्येक घरातून सुरू होईल, असा विश्वास मोदींना आहे. दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल झाल्यास झुनोटिक रोगांसारखे विषय, वैदिक गणित, कोडींग आणि स्वच्छ भारत या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी वेगवेगळ्या मंत्रालयांकडून मिळणाऱ्या सूचना समोर आल्या आहेत.
राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कमधील तज्ञांची एक टीम मंत्रालयांकडून मिळालेल्या सूचनांचे विश्लेषण करणार आहे आणि त्यानंतरच (एनसीईआरटी) पुस्तकांमध्ये बदल केला जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदलासाठी मागवण्यात आलेल्या सूचनांमध्ये आतापर्यंत पर्यावरण मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या या बदलाबाबत सूचना दिल्या आहेत.