“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॅाब लिंचिंगच्या घटना सारख्याच”

मुंबई | Sai Pallavi’s Statement Under Discussion – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या खास अंदाजासाठी ओळखली जाते. तसेच साई पल्लवी काही ना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत येत असते. अलीकडेच, तिच्या आगामी विराट पर्वम चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, तिने केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. साई पल्लवीने बॅालीवूड चित्रपट ‘द काश्मीर फाईल्समध्ये’ दाखवलेल्या काश्मिरी पंडीतांच्या हत्येच्या दृश्याची मॅाब लिचिंगशी तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

“द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला आहे. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करुन घेऊन जाणाऱ्या मुस्लीम चालकाला मारण्यात आलं, जय श्री राम अशा घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॅाब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत,” असं साई पल्लवीनं म्हटलं असून तिच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

“मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, असा सवाल साई पल्लवीने उपस्थित केला आहे.

“जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता,” असंही साई पल्लवीने म्हटलं आहे.

Sumitra nalawade: