पुणे : नुकताच रिमझिम पाऊस झालेला… सकाळची वेळ… सर्वत्र दाट धुके… मात्र सिंहगड ट्रेक करण्याची जिद्द. अशातच डोंगराचा मोठा भाग कोसळला, पायवाटेने वर येत असलेल्या हेमंगच्या अंगावर मोठे दगड आले… तो दरीत फेकला गेला… दगड मातीच्या ढिगार्याखाली गाडला गेला… आणि तेथेच घात व दुर्दैवी अंत झाला. अथक प्रयत्नानंतर शोधमोहीम पथकाला हेमंगचा मृतदेह ढिगार्याखाली दिसला. त्यावेळी क्षणभर का होईना, सिंहगडही स्तब्ध झाला असेल, वेदनादायी प्रसंग समोर आला.
शनिवारी सकाळी सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ पायवाटेवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. दुर्दैवाने यामध्ये एका प्रशिक्षित ट्रेकर्सचा दगडांच्या ढिगार्याखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. हेमंग धीरज गाला (वय ३१, रा. मित्रमंडळ चौक, पुणे) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुण ट्रेकर्सचे नाव आहे. वनविभागाच्या प्राथमिक बचाव पथकाच्या (पीआरटी) जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्रीच्या अंधारात मृतदेह दरीतून बाहेर काढला.
एखाद्या गड अथवा ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला येण्यासाठी कुणालाही बंधन नाही. मात्र, नियम व अटींचे पालन करणे गरजेचे असते. सिंहगडावर एका ट्रेकर्सचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. त्या ट्रेकर्सची संपूर्ण जबाबदारी स्पर्धा आयोजकांची होती. अशा ट्रेकर्सना आयोजकांनी सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाला दोष देऊ नये.
प्रदीप संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, (जिल्हाधिकारी कार्यालय)
सहभागी ट्रेकर्सनी अशी घ्यावी काळजी…
तुमच्या घरच्या मंडळींना तुम्ही कुठे जाताय, कोण-कोण सोबत आहे, जर एखाद्या संस्थेसोबत जात असाल तर तिचं नाव, जबाबदार व्यक्तीचा संपर्क देऊन ठेवा. तुमच्यासोबत असलेल्या एखाद-दोन मित्रांचे संपर्क क्रमांकही देऊन ठेवा. तुमचा प्रवास कुठल्यामार्गे असेल, तुम्ही अंदाजे घरी कधी परतणार, ती वेळही सांगून ठेवा. एखाद्या संस्थेसोबत जात असाल तर त्यांची माहिती घ्या. त्यांचा ट्रेकिंग क्षेत्रातला अनुभव किती आहे, सुरक्षिततेसाठी ते काय उपाययोजना करतात, त्याची माहिती आधी करून घ्या. पावसाळी ट्रेकिंग म्हणजे पायात जे शूज घालणार असाल, ते पाण्यात वापरण्याजोगे व न घासले जाणारे असू द्या. अंगावरचे कपडे लवकर सुकणारे आणि हलके असू द्यावे.
ट्रेकर्संनी काळजी घेण्याचे आवाहन…
शनिवार, रविवार सुट्यांमुळे गडावर पर्यटकांची गर्दी होत असते. तसेच पावसाचे दिवसदेखील आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता लक्षात घेऊन, ट्रेकर्स आणि पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊनच पर्यटन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंहगड एपिक ट्रेक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. कल्याण गावाच्या बाजूने सर्व स्पर्धक पायवाटेने गडावर येत होते. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी जागोजागी स्वयंसेवक उभे होते. दाट धुके असल्याने काही दिसत नव्हते. सकाळी सिंहगडाच्या कल्याण दरवाजाच्या खालच्या बाजूला डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी पायवाटेने वर येत असलेल्या हेमंगच्या अंगावर मोठ-मोठे दगड आले व त्याबरोबर तो दरीत फेकला गेला. खाली काही अंतरावर या दगड-मातीच्या ढिगार्याखाली तो गाडला गेला.
कोसळलेल्या दरडीत हेमंगचा शोध घेण्यात येत होता. माती व पावसामुळे खाली उतरताना आधार मिळत नव्हता. अत्यंत सावधगिरीने शोधकार्य करून मोठ्या दगडांच्या ढिगार्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढल्याची माहिती तानाजी भोसले पीआरटी पथकाच्या जवानाने दिली. पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी मृतदेह कल्याण दरवाजाजवळ आणला.
आयोजकांचा हलगर्जीपणाच जबाबदार
छंद किंवा आवड म्हणून बहुतांश ट्रेकर्स गडावर ट्रेक करण्यासाठी जात असतात. अशा ट्रेकरकरिता आयोजकांकडून विविध स्पर्धाही घेतल्या जातात. सिंहगड एपिक ट्रेकतर्फे स्पर्धा आयोजिण्यात आली होती. ट्रेक करीत असताना दरड कोसळल्याने त्याला जीव गमवावा लागला. सांगायचे तर सहभागी स्पर्धकांची पूर्वनोंदणी करण्यात आली होती. तसेच प्रत्येकाला क्रमांक देण्यात आलेले होते. ज्या मार्गावरून ट्रेकर्स जाणार होते त्याच मार्गावर दरड कोसळलेली असताना आयोजकांनी सर्व स्पर्धक परतले की नाही, याची खातरजमा का केली नाही? हेमंग बेपत्ता असल्याचे आयोजकांच्या लक्षात कसे आले नाही? आयोजकांचा हाच हलगर्जीपणा हेमंगच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार ठरला.
सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव…
गडावर जाणार्या ट्रेकर्ससाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता उपाययोजना नसल्याचे दिसून आलेे. गडावर ट्रेकर्ससाठी जाणार्यांची संख्या अधिक असते. पायी चढून गड सर केला जातो. उंच गडावर ट्रेकर्ससाठी स्वरक्षण यंत्रणा, स्वरक्षण कठडे उभे करणे शक्य नसल्याचे गड प्रशासनाकडून सांगितले जाते. बहुतांश ठिकाणी अनेक ट्रेकर्सकडून दोरखंडाच्या माध्यमातून ट्रेक केला जातो.
त्यासाठी ट्रेकर्सना चांगल्या प्रशिक्षणाची गरज असते. ट्रेकर्सना बूट, लाईफसूट, कॅप अथवा छोट्या स्वरूपाचे हेल्मेट, हॅन्डग्लोज इत्यादी साहित्य पुरविणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यासोबत गड चढत असताना एका निपुण आणि कुशल ट्रेकर्सला पाठविले जाते. गड ट्रेकर्सच्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना करावी.