बहिणीने केली भाऊबीजला किडनी दान

शिरुर तालुक्यातील बहिण भावाची अनोखी भाऊबीज

शिक्रापूर : बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सन म्हणजे भाऊबीज. या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला तसेच बहिण आपल्या भावाला काही भेट देत असते. मात्र, शिरुर तालुक्यातील एका बहिणीने भाऊबीजच्या दिवशी आपल्या लहान भावाला चक्क किडनी दान देत भावाला या निमित्ताने नवजीवनाची भेट दिली आहे. करंदी ता. शिरुर येथील बाळासाहेब ढोकले यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची लागण झाली. त्यावेळी उपचार सुरु असताना त्यांना शुगर व बिपीचा त्रास होऊ लागला. त्यांनतर कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील त्यांना वेगवेगळा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आढळरावांच्या माध्यमातून निधी उपलब्ध

बाळासाहेब ढोकले यांच्यावर उपचार करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाला असून पुढील काही निधी मिळवण्यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले यांनी सांगितले.

मात्र, नेहमी वेगवेगळा त्रास होत असल्याने त्यांची पुणे येथे तपासणी केली असता बाळासाहेब ढोकले यांची एक किडनी निकामी झाल्याचे मे २०२२ मध्ये समोर आले. दरम्यान त्यांच्यावर काही उपचार करत डायलेसीस करण्यात आले. मात्र किडनी निकामी असल्याने संपूर्ण कुटुंब हैराण झालेले असताना चेन्नई येथे किडनीबाबत खात्रीशीर उपचार केले जात असल्याची माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने दिली. तर बाळासाहेब यांची मोठी बहिण रंजना विजापूरकर हिने मी भावासाठी किडनी दान करणार असल्याचे सांगितले.

त्यावेळी बाळसाहेब ढोकले यांचा मुलगा युवा सेनेचे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून वडील व आत्यांसह चेन्नई गाठली तेथे दोघा बहिण भावांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी दोघांचे रक्तगट व आदी बाबी समांतर होत असल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरले अन् त्याबाबतच्या शस्त्रक्रिया पूर्ण करत किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असून, बाळासाहेब ढोकले यांची देखील प्रकृती पूर्णपणे बरी झालेली आहे. लवकरच ते आता शिरुर तालुक्यात येणार असल्याचे युवा सेनेचे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले यांनी सांगितले.

Nilam: