दिल्ली : सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे. भारतीय जवान दिवसरात्र देशाचे रक्षण करत असतात . आता तेथेच गणपती मूर्तीची स्थापना होणार आहे यामुळे त्यांना प्रेरणा मिळणार आहे. ‘दगडूशेठ गणपती’च्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती एकता व अखंडतेचे प्रतिक असलेल्या भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये स्थापन करण्याची इच्छा बटालियनतर्फे व्यक्त केली आणि ट्रस्टने त्यांच्या इच्छेला मान देऊन ‘श्रीं’ची हुबेहुब दोन फूटांची उंची प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले.
याआधी काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाब येथील सिमावर्ती भागांत भारतीय सैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना केल्यानंतर, आता थेट सियाचीनमध्ये भारतीय सिमेवर सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे. यापूर्वी देखील काश्मीर येथील गुरेज सेक्टर येथे ६ मराठा बटालियनने आणि नंतर १ व ६ मराठा बटालियनने अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली.
तसेच ही मूर्ती पुण्यातील मूर्तीकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली असून नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली.पुण्यामध्ये अनेक भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र, भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना श्रींचं दर्शन घेता येत नाही. म्हणून २२ मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा बटालियनच्यावतीने व्यक्त केली. त्यांची ही इच्या पूण झाली असून २२ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची दोन फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, आदी उपस्थित होते.